रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने सहा वर्षीय बालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. हैदर असीम अन्सारी असे जखमी बालकाचे नाव असून, कुत्र्याच्या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी प्रसंगावधान राखत कुत्र्याला हुसकावून बालकाची सुटका केली. त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदर अन्सारी हा मंगळवारी सायंकाळी कीर्तीनगर परिसरात नेहमीप्रमाणे खेळत होता. यावेळी अचानक आलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घालत जोरदार चावा घेतला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे बालक घाबरून मोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावत हैदरची सुटका केली.
या हल्ल्यात बालकाच्या शरीरावर खोल जखमा झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरू असून, आवश्यक लसीकरणाची प्रक्रियाही करण्यात येत आहे.
दरम्यान, कीर्तीनगर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही या परिसरात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











