मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील वाल्मिकीनगर परिसरात जागेच्या जुन्या वादातून एका महिला आणि तिच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला आपल्या घरासमोर रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या मालापैकी उरलेले साहित्य कामगारांची परवानगी घेऊन घराच्या पायरीसाठी वापरत होती. यावेळी जागेच्या मालकीच्या जुन्या वादातून आरोपी तेथे आले आणि संबंधित जागा त्यांच्या मालकीची असल्याचा दावा करत महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत तिच्या घरावर हल्ला चढवला. काठी आणि दगडांच्या सहाय्याने घरावरील कौले फोडण्यात आली. तसेच घरालगत असलेली चिऱ्याची पडवी तोडून आतील साहित्य बाहेर रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे घराचे मोठे नुकसान झाले.
यानंतर आरोपींनी घरातील लाकडी शिडी उचलून फिर्यादी महिलेला मारहाण केली. या गोंधळात भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या ७० वर्षीय आईलाही आरोपींनी लक्ष्य केले. तक्रारीनुसार, आरोपींपैकी एकाने घरातील फावडे वृद्ध महिलेच्या दिशेने फेकून मारले. या हल्ल्यात वृद्ध महिलेच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर फिर्यादी महिलेच्या डोक्याला व छातीला मार लागून ती जखमी झाली.
घटनेनंतर जखमी महिलांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे बिलाल साठे, माज साठे, साद साठे आणि साहीम साठे (सर्व रा. पटेल मोहल्ला, बाणकोट) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून हल्ल्याचे नेमके कारण, मालमत्तेचे झालेले नुकसान आणि संबंधित जागेच्या वादाची पार्श्वभूमी याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे बाणकोट परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध महिलेला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













