चिपळूणमध्ये दारुबंदी कायद्यांतर्गत दोन कारवाया, देशी दारू व हातभट्टीची दारू जप्त

banner 468x60

चिपळूण पोलिसांनी दारुबंदी कायद्यांतर्गत केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये देशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोसरे येथे देशी दारू जप्त

१६ जून २०२६ रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास पोसरे येथील सुंदरवाडी परिसरात आरोपीच्या राहत्या घराच्या मागील बाजूस उघड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सचिन वसंत रेडीज (वय ५८, रा. पोसरे, सुंदरवाडी, ता. चिपळूण) हा देशी दारू विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठा करून ठेवताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १८० मिली मापाच्या ‘टँगो पंच’ या देशी दारूच्या १२ बाटल्या जप्त केल्या. जप्त मालाची किंमत ९६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस हवालदार महेश हरिश्चंद्र चिले यांनी फिर्याद दिली असून चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

पिंपळी खुर्द येथे हातभट्टीची दारू जप्त

दुसऱ्या कारवाईत १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळी खुर्द येथील कॅनॉलजवळ झाडीझुडपांच्या आडोशाला चोरट्या पद्धतीने गावठी दारू विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून संजय कृष्णा जंगम (वय ४८, रा. खडपोली, ब्राह्मणवाडी, ता. चिपळूण) याच्या ताब्यातून ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. जप्त दारूची किंमत ९५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत रमाकांत सकपाळ यांनी फिर्याद दिली असून चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *