रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळवंडे गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे २ लाख ९० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज ५ जूनला कारवाई केली आहे. या कारवाईत ६ हजार लिटर रसायन, १०५ लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मौजे कळवंडे, वरपेवाडी हद्दीतील धरणालगतच्या जंगल परिसरात छापा टाकला.

या ठिकाणी बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारूची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान नंदेश सदाशिव वरपे (रा. कळवंडे, वरपेवाडी, ता. चिपळूण) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गुन्हा क्रमांक १३८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (फ) आणि (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील आरडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्शद शेख तसेच जवान शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि निखील लोंढे यांनी संयुक्तपणे पार पाडली.
विशेष म्हणजे, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, चोरीबंदी आणि वणवाबंदी यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक शासकीय पुरस्कार प्राप्त केलेल्या कळवंडे गावात अवैध हातभट्टी दारू व्यवसाय सुरू असल्याची माहिती काही महिन्यांपासून ग्रामस्थांकडून दिली जात होती. ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमी परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री सुरू असल्याच्या तक्रारींनंतर अखेर उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्य वाहतूक, साठा किंवा बनावट माडी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुनील आरडेकर करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













