चिपळूण : शिरगाव येथे सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आकस्मिक मृत्यूची नोंद

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे शिगवण महाराज मठामागील शेतात बेवारस अवस्थेत सडलेल्या मृतदेहाचा शोध लागल्याने बुधवारी परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासानंतर या मृतदेहाची ओळख पटली असून तो अलोरे येथील महेश राजाराम यादव यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, महेश यादव हे चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील रहिवासी होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, नशेच्या अवस्थेत ते अनेकदा विविध ठिकाणी पडलेले आढळत असत. काही वेळा ते अनेक दिवस घरी परतत नसल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चिंता वाटत असे. यावेळीही ते गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते.

बुधवारी सकाळच्या सुमारास शिरगाव येथील शिगवण महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या शेतामध्ये एका व्यक्तीला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटविणे कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने शिरगाव पोलिसांशी संपर्क साधला.

माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठविला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तपासादरम्यान आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख महेश राजाराम यादव अशी पटली. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यामागे कोणतेही संशयास्पद कारण आहे का, तसेच ते शिरगाव परिसरात कसे पोहोचले याबाबत पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. प्राथमिक स्तरावर कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसली तरी शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे अलोरे आणि शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *