चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाच प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात एका गर्भवती महिलेकडून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केल्यानंतर आरोग्य विभागानेही प्रशासकीय पातळीवर निलंबनाचा निर्णय घेतला आहे.
डॉ. मदार या वर्ग २ अ गटातील वैद्यकीय अधिकारी असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला होता. प्रस्तावावर विचार करून अखेर त्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. या निर्णयामुळे आरोग्य विभागाने भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जून रोजी सायंकाळी कामथे उपजिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचला होता. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट देण्यासाठी डॉ. मदार यांनी ४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता. तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने कारवाई केली.
तपासादरम्यान डॉ. मदार यांनी तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम त्यांच्या एमएच ०८ एएक्स २६१८ क्रमांकाच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्हा आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. मदार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे सरकारी आरोग्य सेवांमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













