लग्नसोहळा आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात घडली आहे. १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या चोरीप्रकरणी तब्बल दहा दिवसांनंतर म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृती संदेश मोरे (वय ३२, व्यवसाय स्टेशनरी, रा. नाना सोसायटी, कोपरी, ठाणे पूर्व) यांनी त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आईकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. त्यांच्या आईने हे मंगळसूत्र एका बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स हँडबॅगमध्ये ठेवला होता. त्यानंतर त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात गेल्या होत्या.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र असलेली हँडबॅग मंगल कार्यालयातील वराच्या खोलीत ठेवली होती. मात्र, याच संधीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने हँडबॅगमधील बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन ४४.४८० ग्रॅम असून त्यामध्ये सोन्याचे मणी आणि दोन सोन्याच्या डवळ्या आहेत. पट्टीच्या डिझाइनचे हे मंगळसूत्र असून त्याची किंमत १ लाख ८७ हजार ३४९ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, मंगळसूत्राचा शोध न लागल्याने त्यांनी विलंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













