Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

हर्णे : किनारपट्टीवर डिझेल तस्करीचा मोठा भांडाफोड; दोन बोटी जप्त, दोन्ही बोटी तात्काळ दाभोळला दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टी परिसरात सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ‘रत्न माऊली’ नावाची तस्करी करणारी बोट आणि डिझेल खरेदी करणारी दुसरी बोट अशा दोन बोटी जप्त करण्यात आल्या असून, बोटीचा मालक आणि तांडेल अशा दोघांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई

हर्णे किनारपट्टीवर एक मासेमारी बोट इतर बोटींना अवैधरित्या डिझेल विकत असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीची पडताळणी करत अधीक्षक (P&I) अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २१ एप्रिल २०२६ च्या रात्री विशेष समुद्री शोधमोहीम हाती घेतली.

मध्यरात्री रंगेहात पकड

हर्णे किनाऱ्यापासून सुमारे ११ नॉटिकल मैल अंतरावर ‘रत्न माऊली’ ही संशयित बोट पथकाला आढळली. २१ आणि २२ एप्रिलच्या मध्यरात्री ही बोट इतर बोटीला डिझेल विक्री करत असतानाच अधिकाऱ्यांनी धाड टाकत दोन्ही बोटी रंगेहात पकडल्या. या कारवाईत कोणताही प्रतिकार होऊ नये यासाठी पथकाने काळजीपूर्वक नियोजन केले होते.

मोठ्या प्रमाणात डिझेल जप्त

कारवाईनंतर दोन्ही बोटी तात्काळ दाभोळ जेटी येथे आणण्यात आल्या. बोटींच्या कप्प्यांमध्ये साठवलेले मोठ्या प्रमाणातील अवैध डिझेल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, गेल्या दोन महिन्यांत ‘रत्न माऊली’ या बोटीमार्फत सुमारे ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी करून विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अवैध इंधन व्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू

या प्रकरणामागे केवळ एक-दोन व्यक्ती नसून मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता सीमाशुल्क विभागाने व्यक्त केली आहे. तस्करीचे हे डिझेल नेमके कुठून आणले जात होते, कोणत्या बोटींना पुरवठा होत होता आणि आर्थिक व्यवहार कसे होत होते, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

न्यायालयीन कोठडी

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील शेखर डी. टोणपे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. दापोली येथील माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी हा अर्ज मंजूर करत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

नागरिकांना आवाहन

दरम्यान, सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, किनारपट्टीवर किंवा समुद्रात संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. नागरिक ८७९६८९५९९० किंवा ८४२११८४७५० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती देऊ शकतात, असे जनसंपर्क अधिकारी लक्ष्मीकांत भाटकर यांनी कळवले आहे.

या कारवाईमुळे हर्णे किनारपट्टीवरील तस्करीविरोधात मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *