दापोली तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून घडलेल्या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ निर्माण झालीआहे. एका ७६ वर्षीय वृद्धाला जिवे मारण्याची धमकी देत स्वतःवरच सुऱ्याने वार करून घेणाऱ्या इसमाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर भिकाजी यादव हे त्यांच्या मालकीच्या जुन्या घराची दुरुस्ती करत होते. या वेळी महेंद्र सिताराम पवार हा संबंधित जागेत बेकायदेशीररीत्या शिरला. या जागेबाबत पूर्वीपासून वाद असल्याचेही समजते. फिर्यादी यांनी त्या ठिकाणी घुसखोरी न करण्यास तसेच त्वरित निघून जाण्यास सांगितले. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
घटनेनंतर काही वेळाने महेंद्र सिताराम पवारने पुन्हा घटनास्थळी परतला. यावेळी त्याच्या हातात सुरा होता. त्याने फिर्यादींकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास स्वतःवरच सुरा चालवून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने हातातील सुरा हवेत फिरवत अचानक स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले. या प्रकारामुळे परिस्थिती गंभीर बनली आणि फिर्यादींच्या जीवितालाही धोका निर्माण झाला.
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, संबंधित जागेबाबत न्यायालयाचा निर्णय असतानाही आरोपीने त्या आदेशाचा अवमान करत पुन्हा घुसखोरी केल्याचा आरोप आहे.
फिर्यादी मनोहर यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी महेंद्र पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२५ (अ), ३२९(३), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ नुसार नोंदवला आहे. स्वतःला जखमी करून दुसऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे, जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे या गंभीर बाबींचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत असून, पुढील कारवाई लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













