गुहागर : टाटा आयरीशचा चुकीचा टर्न आणि तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातात दुसरा गंभीर जखमी

banner 468x60

गुहागर तालुक्यातील चिखली परिसरात आज (१६ एप्रिल) दुपारी साधारण साडेबारा ते एकच्या सुमारास भीषण अपघात घडला असून यात एका २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. स्वामी समर्थ मठाजवळ हा अपघात झाला असून परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन तरुण दुचाकीवरून (Suzuki Access MH08BH8830) चिपळूणच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक (MH12HV5195) या वाहनाशी त्यांची जोरदार धडक झाली.

टाटा मॅजिक वाहन प्रवासी उतरवून रस्त्यावरून वळण घेत असताना ही धडक झाल्याचे सांगितले जात आहे. दुचाकीचा वेग अधिक असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात ओम संतोष शीतप (वय २२, रा. पवारसाखरी, ता. गुहागर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी असून त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

दुसरा तरुण ऋतिक रमेश भुवड (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सुरुवातीला चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. काही काळासाठी रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दुर्घटनेनंतर चिखली व पवारसाखरी परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी भरधाव वेग आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यावर चिंता व्यक्त केली आहे.

पोलीस या अपघातामागील नेमकी कारणमीमांसा, वाहनांची स्थिती आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *