गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत मुंढर-कातकिरीच्या सरपंच अमिषा अजित गमरे यांच्या उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्याची दखल घेत पुणे येथील नालंदा ऑर्गनायजेशन या सामाजिक संस्थेतर्फे त्यांची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे मुंढर-कातकिरी गावासह संपूर्ण गुहागर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नालंदा ऑर्गनायजेशन ही संस्था महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व लोकप्रतिनिधींचा अभ्यास करून त्यांना सन्मानित करत असते. ग्रामीण विकास, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांची निवड संस्थेमार्फत केली जाते. यंदा मुंढर-कातकिरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कार्याची सखोल दखल घेत सरपंच अमिषा अजित गमरे यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अमिषा गमरे यांनी सरपंचपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ग्रामविकासाला प्राधान्य देत विविध विकासकामांना गती दिली. पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय योजनांमधून निधी उपलब्ध करून गावात पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, अंगणवाडी व शैक्षणिक सुविधांचा विकास अशा अनेक कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणे, स्वयं-सहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन देणे, महिलांचा ग्रामविकासातील सहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली आहे.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केले आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे गावाची विकासात्मक ओळख अधिक मजबूत झाली आहे. लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे गावाला विविध पुरस्कारही प्राप्त झाले असून, त्या यशामध्ये सरपंच अमिषा गमरे यांचे नेतृत्व आणि नियोजन महत्त्वाचे ठरले आहे.
ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेत नालंदा ऑर्गनायजेशनने त्यांना ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान’ पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव असला तरी तो संपूर्ण मुंढर-कातकिरी ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि ग्रामविकासासाठीच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सरपंच अमिषा गमरे यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, अधिकारी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली मुंढर-कातकिरी गाव विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













