गुहागर : भरधाव स्कूटर अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; मयत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा मार्गावर झालेल्या भीषण स्कूटर अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीरेंद्र सुभाष घाडे (वय २४) यांचा मुंबईतील KEM Hospital येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विशेष म्हणजे या प्रकरणात स्वतःच्या निष्काळजी वाहनचालकामुळे अपघात घडल्याचे निष्पन्न झाल्याने मयत चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उमराठ घाडेवाडी (ता. गुहागर) येथील व सध्या मुंबईतील सांताक्रुझ (पूर्व) परिसरात वास्तव्यास असलेले वीरेंद्र घाडे हे ७ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या सुझुकी बर्गमन (MH 02 GF 0370) स्कूटरवरून बोऱ्या फाटा ते पिंपर फाटा मार्गे जात होते. मौजे वाडदई गावाच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी रात्रीची वेळ व रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने स्कूटरवरील ताबा सुटून गंभीर अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, नाकाला व तोंडाला गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची सुरुवातीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे ९ एप्रिल २०२६ रोजी गुहागर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. ४ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात अपघातातील गंभीर दुखापतींमुळे मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पोलीस चौकशीत वीरेंद्र घाडे हे स्वतःच्या मृत्यूस तसेच वाहनाच्या नुकसानीस स्वतःच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुहागर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार स्वामिनी समित नाटेकर यांच्या फिर्यादीवरून मयत वीरेंद्र घाडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा क्रमांक ४८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *