खेड : मांडावे येथे गोठ्याला भीषण आग, आर्थिक नुकसान

banner 468x60

खेड तालुक्यातील मांडावे येथे रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून दोन विधवा महिलांचा गोठा पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात भीती व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री संतोष मोरे आणि शारदा संतोष मोरे यांच्या मालकीच्या गोठ्याला अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण गोठ्याला वेढा घातला.

आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील गुरे व वासरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, गोठ्यातील चारा, शेतीसाठी लागणारे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या.

या आगीत अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे. संबंधित दोन्ही महिला विधवा असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यतः दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या समोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी डुकरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनिता कासार, मांडवे पोलीस पाटील नरेश तांबे, वाडी जैतापूर पोलीस पाटील बाळकृष्ण कासार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या दुर्घटनेत नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच आगीचे नेमके कारण शोधून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *