खेड लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीकडून दुर्गंधीयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, नाले आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, सुमारे चार ते पाच हजार लोकवस्तीच्या नैसर्गिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनी परिसरातून वेळोवेळी दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर सोडले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोतांपर्यंत पोहोचल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सांडपाण्याचा शेतीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रकाराबाबत एमआयडीसी प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यापूर्वी वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, संबंधित यंत्रणांकडून या तक्रारींची अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून सांडपाणी नेमके कोठून सोडले जात आहे, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते आणि त्याचा जलस्रोत, शेती व पर्यावरणावर काय परिणाम होत आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार तातडीने थांबवून संबंधित यंत्रणांनी योग्य ती कार्यवाही केली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांचे आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत यांच्याशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष असगणी अशोक धाडवे आणि असगणी शिवसेना शाखाप्रमुख इस्माईल कादरी यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडत संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













