रत्नागिरी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, रत्नागिरीत शोककळा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि रत्नागिरीतील ज्येष्ठ राजकीय नेते राजेश सावंत यांचे बुधवारी संध्याकाळी प्रवासादरम्यान आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत हे मित्रांसमवेत जिल्ह्याबाहेर गेले होते. बुधवारी संध्याकाळी घरी परतत असताना पाली परिसरात प्रवासादरम्यान त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजेश सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहवासात केली होती. उदय सामंत यांच्या पहिल्या निवडणूक विजयात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यानंतर उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला आणि पुढे भारतीय जनता पक्षात दाखल होत रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

अलीकडच्या काळात ते कोणत्याही राजकीय पक्षाशी सक्रियपणे संबंधित नव्हते. उत्कृष्ट क्रिकेटपटू, मनमिळावू स्वभाव आणि सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबात वेगळे राजकीय समीकरण निर्माण झाले होते. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने यांच्या सून तसेच राजेश सावंत यांच्या कन्या यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये आणि पक्षाची प्रतिमा अबाधित राहावी, या संवेदनशील भूमिकेतून राजेश सावंत यांनी स्वतःहून भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजकारणापेक्षा नाती आणि मूल्यांना त्यांनी नेहमीच अधिक महत्त्व दिले.

सध्या त्यांचे पार्थिव पाली येथील रुग्णालयात ठेवण्यात आले असून, तेथून ते रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येणार आहे. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याने एक संवेदनशील, अभ्यासू आणि सर्वांना आपलेसे करणारे नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *