चिपळूण : विभा अरविंद ग्रंथालयास सुहास चव्हाण यांच्याकडून 11 हजार रुपयांची देणगी

banner 468x60

चिपळूण-खेड येथील विभा अरविंद ग्रंथालयाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला बळ देण्यासाठी संस्थापक संचालक तथा चिपळूण नगरपरिषदेचे निवृत्त बांधकाम अधिकारी सुहास चव्हाण यांनी ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या या योगदानामुळे ग्रंथालयाच्या उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

banner 728x90

नुकतेच पुनरुज्जीवित झालेल्या विभा अरविंद ग्रंथालयाने अल्पावधीतच वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळाच्या सक्रिय सहभागातून आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अशा वेळी सुहास चव्हाण यांनी दिलेली आर्थिक मदत ग्रंथालयाच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सुहास चव्हाण हे चिपळूण नगरपरिषदेत बांधकाम अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी मनमिळाऊ स्वभाव, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्थांना सक्रिय सहकार्य केले आहे. चिपळूण-खेड परिसरातील मराठी शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ते सातत्याने कार्यरत असून, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचेही ते सक्रिय संचालक आहेत.

साहित्यप्रेमी प्रकाश (काका) देशपांडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले विभा अरविंद ग्रंथालय आज सात हजारांहून अधिक पुस्तकांनी समृद्ध झाले आहे. विविध विषयांवरील पुस्तकसंपदा, वाचन संस्कृतीला चालना देणारे उपक्रम आणि समाजाभिमुख कार्य यामुळे ग्रंथालयाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या ग्रंथालयाला भेट देऊन उपक्रमांचे कौतुक केले आहे.

वाचन संस्कृती जपणे आणि ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा ग्रंथालयाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी ग्रंथालयाने आपलं चिपळूण आणि टच संस्था या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांशी समन्वय साधला आहे. या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये आणि प्रत्येक मुलाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता यावे, यासाठी या संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत.

समाजाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक आधार देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सहकार्याचे हात पुढे येत आहेत. सुहास चव्हाण यांच्या देणगीमुळे या कार्याला आणखी बळ मिळणार असल्याचा विश्वास ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, संचालक प्रसाद रिसबूड, विकास मेहेंदळे, मार्गदर्शक प्रकाश देशपांडे तसेच कार्यवाह विजय कदम उपस्थित होते. देणगी दिल्याबद्दल सर्व संचालकांनी ग्रंथालयाच्या वतीने सुहास चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *