देवरुख परिसरात लग्नकार्याचा बहाणा करून बनावट सोन्याचे दागिने विकत एका तरुणाची तब्बल ३.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलेश प्रकाश गुजर (रा. बेनी खुर्द, गुजरवाडी) हे २० एप्रिल रोजी लांजा येथील ‘यंग लुक’ या कपड्यांच्या दुकानात कामावर होते. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी गुजर यांच्याशी ओळख वाढवत संवाद साधला आणि “गावी लग्नकार्य आहे, मात्र सध्या मोठी आर्थिक अडचण आहे,” असे सांगत सहानुभूती मिळवली.
विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळ असलेले जुन्या धाटणीचे सोन्याचे दागिने दाखवले. या दागिन्यांमध्ये जोंधळी मणी आणि तारेत गुंफलेला हार असल्याचे त्यांनी सांगितले. खात्री पटावी म्हणून त्यांनी त्या हारातील दोन-तीन मणी गुजर यांना तपासणीसाठी दिले. गुजर यांनी त्या मण्यांची तपासणी केली असता ते खरे सोने असल्याचे दिसून आले.
यानंतर आरोपींनी गुजर यांच्याशी मोबाईलवर संपर्क ठेवत संपूर्ण दागिने ३ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा सौदा पक्का केला. हा व्यवहार संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात पार पडला. गुजर यांनी आरोपींना रोख रक्कम दिली आणि दागिने ताब्यात घेतले.
मात्र काही वेळाने दागिन्यांची पुन्हा नीट तपासणी केल्यावर ते बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुजर यांनी तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच घटनेचा प्राथमिक अहवाल देवरुख येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना दक्षता बाळगावी, तसेच रस्त्यावर किंवा अपरिचितांकडून सोन्याचे व्यवहार टाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













