देवगड : तारामुंबरी आणि कुणकेश्वरच्या सागरी पट्ट्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ चे उल्लंघन करत किनाऱ्यालगत सुरू असलेल्या अवैध पर्ससीन मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई तीव्र केली आहे. सोमवारी सकाळी समुद्रात गस्त घालत असताना रत्नागिरी येथील ‘इब्राहिम युसूफ’ (IND-MH-४-MM-५६३५) ही पर्ससीन नौका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पकडून जप्त केली. दरम्यान, देवगड येथील ‘हरिकृपा-१’ (IND-MH-५-MM-३९०२) या मिनी पर्ससीन नौकेने गस्ती पथकाची चाहूल लागताच घटनास्थळावरून पलायन केले.
ही कारवाई विभागाची सलग तिसरी मोठी कारवाई ठरल्याने पारंपरिक मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे परवाना तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी सुरक्षा रक्षकांच्या पथकासह ही मोहीम राबवली. तारामुंबरी आणि कुणकेश्वरसमोरील समुद्रात अवघ्या ३ ते ४ वाव उथळ पाण्यात पर्ससीन पद्धतीने मासेमारी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार गस्ती पथकाने कारवाई केली.
नौकेवर २० परप्रांतीय खलाशी
ताब्यात घेतलेल्या ‘इब्राहिम युसूफ’ या नौकेची तपासणी केली असता त्यावर तब्बल २० परप्रांतीय खलाशी कार्यरत असल्याचे आढळून आले. संबंधित नौकेकडे कायद्यानुसार १२ सागरी मैलांच्या पलीकडे मासेमारी करण्यासाठी एक्सेस पास उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही नौका किनाऱ्यालगतच्या उथळ समुद्रात मासेमारी करत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले.
कारवाईनंतर नौका देवगड बंदरात आणून जप्त करण्यात आली असून संबंधितांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘हरिकृपा-१’वरही कारवाई प्रस्तावित
गस्ती पथकाची चाहूल लागताच ‘हरिकृपा-१’ या मिनी पर्ससीन नौकेने घटनास्थळावरून पलायन केले. या नौकेविरोधातही कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली.
पारंपरिक मच्छीमारांच्या मागणीला प्रतिसाद
किनाऱ्यालगत होणाऱ्या अवैध पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पारंपरिक रांपण संघाने यापूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नियमित गस्त आणि कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर विभागाने समुद्रातील गस्त वाढवून कारवाईचा वेग वाढवला आहे.
या कारवाईचे पारंपरिक मच्छीमारांकडून स्वागत करण्यात आले आहे. सागरी संसाधनांचे संवर्धन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी समुद्रातील गस्त आणि अवैध मासेमारीविरोधातील कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













