गुहागर : तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पँथरचे दर्शन

banner 468x60

गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी, खापलेवाडी, डिंगणकरवाडी परिसरात कातळांबा येथे रात्री ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल क्षेत्र कमी झाल्यामुळे वन्य प्राणी मानव वस्तीकडे येण्याचे प्रकार वाढत असून, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास या भागात काळा बिबट्या दिसला. यामुळे नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने कारवाई करून संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अशा घटनांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सध्या भीतीमुळे बाहेर पडणेही कठीण झाले आहे.

यापूर्वी सुमारे सहा महिन्यांपूर्वी खोडदे येथील शेतकरी रमाकांत साळवी यांच्या वाड्यात घुसून एका बिबट्याने वासराचा बळी घेतल्याची घटना घडली होती. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याची भीती अधिकच बळावली आहे.

ब्लॅक पँथर दिसल्याची माहिती सर्वेश साळवी यांनी वन विभागाला दिली असून, या घटनेचे चित्रीकरण भुषण पवार यांनी केले आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व जंगलवाढीचे नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *