दापोलीतील एसटी वाहकाकडून तरुणीची छेडछाड, चिपळूण स्थानकात संतप्त नागरिकांकडून चोप, वाहक निलंबित

banner 468x60

दापोली आगारातील एका एसटी वाहकाने महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी दापोली-रत्नागिरी मार्गावरील एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा चिपळूण बस स्थानकात हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त प्रवासी व नागरिकांनी संबंधित वाहकाला चांगलाच चोप दिला.

banner 728x90

दरम्यान, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नसल्याचे समोर आले आहे. दीड महिन्यापूर्वी दापोली एसटी स्थानकातही एका युवतीशी गैरवर्तन केल्याचा आरोप याच वाहकावर झाला होता. त्या वेळीही स्थानिक नागरिकांनी त्याला मारहाण केली होती. मात्र, संबंधित महिलांनी पोलिसांत अधिकृत तक्रार न दिल्याने कठोर कारवाई होऊ शकली नसल्याची माहिती समोर येत आहे.

चिपळूण येथील प्रकारानंतर संबंधित वाहकाला चालक पदावर नियुक्त करण्यात आले होते. मात्र, चालक म्हणून दापोली-पांगरी मार्गावर गाडी चालवत असताना दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडून अपघात झाल्याची घटनाही घडली असल्याचे सांगितले जात आहे.

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “अन्याय करणारा जितका दोषी, तितकाच अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर त्या अधिक मुजोर बनतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे.

या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित वाहकावर तातडीने कठोर कारवाई न केल्यास एसटी प्रशासनाला बांगड्या भेट देण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी दिला आहे.

, ८ मे रोजी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख ज्योती विचारे, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, तालुकाप्रमुख सिंधुताई भाटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंटी मोरे, शहरप्रमुख संदीप चव्हाण, विकी गवळी आणि प्रदीप गमरे यांनी दापोली एसटी आगार प्रमुखांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला.

दरम्यान, वाढत्या दबावानंतर रत्नागिरी-दापोली विभाग नियंत्रकांनी संबंधित चालक-वाहक पुंडलिक केंद्रे याला तातडीने निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *