दापोली : उर्दू शाळेजवळ डंपर पलटी, बॉक्साइट वाहतुकीमुळे मांदिवलीत भीतीचे सावट

banner 468x60

दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साइट वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी दुपारी एक गंभीर घटना घडली. मायनिंग साइटवरून बॉक्साइट वाहतूक करणारा एक डंपर शाळेजवळच अचानक पलटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

घटनेच्या वेळी शाळा सुरू असल्याने विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी घबराट पसरली. शाळेच्या अगदी जवळच डंपर पलटल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मांदिवली गावातून दररोज रोवले आणि उंबरशेत भागातून ये-जा करणाऱ्या सुमारे १५० ते २०० डंपरची वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र, गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असून काही ठिकाणी तो आणखी निमुळता होतो. अशा परिस्थितीतही ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

याशिवाय, काही डंपरवर नंबर प्लेट नसल्याचेही वारंवार निदर्शनास येत आहे. वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, बॉक्साइट वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या त्रासाबाबत मानव अधिकार आयोग, दिल्ली येथे प्रकरण प्रलंबित आहे. तरीही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.

“आज झालेली घटना ही प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. शाळेजवळून होणारी ही धोकादायक वाहतूक तात्काळ थांबवली नाही, तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, धोकादायक वाहतूक थांबवावी आणि नियमांचे कठोर पालन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *