दापोली : तुषार महाडिक यांना “महाराष्ट्र रत्न” सन्मान, वन्यजीव संरक्षणातील कार्याचा गौरव

banner 468x60

दापोली तालुक्यातील वाकवली येथील तुषार श्रीधर महाडिक यांचा “महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६” मध्ये “आदर्श वन्यजीव रक्षक” या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा सोहळा शनिवारी, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडला.


नालंदा ऑर्गनायजेशनतर्फे राज्यभरातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात येते. त्यांच्या सर्वेक्षणात तुषार महाडिक यांच्या वन्यजीव संरक्षणातील मोलाच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला.


तुषार महाडिक हे ‘वाइल्ड ऍनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेचे सचिव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते वन्यजीव संरक्षण, जखमी प्राण्यांचे बचावकार्य आणि वन्य प्राण्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या संस्थेमार्फत गावोगावी तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वन्यजीवांबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करत आहेत.


विशेषतः साप, पक्षी आणि इतर वन्य प्राण्यांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, तसेच जखमी वन्यजीवांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वन्यजीवांचे प्राण वाचले असून पर्यावरण संवर्धनातही मोठा हातभार लागला आहे.


या सन्मान सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे तरुणांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होत असून ते समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.


या प्रसंगी त्यांचे आई-वडील, मित्रपरिवार आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *