दापोली : ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

banner 468x60

दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना ११ मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बंधन बडाईक (वय २८, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, खेड) हा ट्रॅक्टर (क्र. MH-17-V-496) घेऊन भोईवाडीकडून फरारे जंगलजेटीकडे जात होता. रस्ता उताराचा असल्याने वाहन चालवताना अचानक त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की चालक सुनील बडाईक याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मृत चालकाकडे ट्रॅक्टर चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. तसेच वाहन चालविण्याचे पुरेसे तांत्रिक ज्ञानही नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचे समोर येत आहे.

या अपघातावेळी चालकाच्या बाजूला बसलेले दोन मजूरही ट्रॅक्टरखाली चिरडले गेल्याने गंभीर जखमी झाले. सोनाली ऊर्फ शानाबाई तुकाराम चव्हाण (वय ४०) यांच्या डोक्याला, पायाला, कमरेला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच संतोष दत्तू चौगले (वय ४१) हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अभिजित रामचंद्र पवार यांनी फिर्याद दिली आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि प्राथमिक तपासाच्या आधारे मृत चालकाने विनापरवाना व निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूसह इतरांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *