दापोली : तरुणाची बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) उघडकीस आली. श्रवण निनाद ठाकूर देसाई (वय २३, रा. ५०१ पित्रे बिल्डिंग, डोंबिवली ईस्ट) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान हे कुटुंब पर्यटनासाठी दापोलीला आले होते.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खबर देणारे निनाद विजय ठाकूर देसाई यांच्या पत्नी आरोही या श्रवणला चहा पिण्यासाठी बोलविण्यास गेल्या असता, बाथरूमच्या दरवाज्याच्या हँडलला टॉवेलच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार पाहताच त्यांनी जोराने आरडाओरड केली.

आवाज ऐकून कुटुंबीय व इतरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी श्रवणच्या गळ्यातील टॉवेल काढून त्याला खाली उतरवले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन खबर देणाऱ्यांचे साडू विक्रांत यांनी हॉटेलच्या रिसेप्शनशी संपर्क साधत तातडीने वैद्यकीय मदतीची विनंती केली.

हॉटेल प्रशासनाने तत्काळ अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. अॅम्ब्युलन्सद्वारे श्रवणला उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद आम. क्रमांक ४१/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *