Breaking News
खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे दापोली : दाभोळ -दापोली रोडवर मारहाण, ‘हॉटेल येथे बार सुरू आहे का?’ विचारल्यानंतर राडा, जॅकच्या रॉडने डोक्यात मारल्याचा आरोप, तिघांविरोधात गुन्हा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेतील धोकादायक खड्ड्याची अखेर कायमस्वरूपी दुरुस्ती गुहागर : उमराठ ग्रामपंचायतीत माजी सैनिक दीपक जालगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

banner 468x60

दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे

आंब्याचे उत्पादन वाढवण्यासाठी केवळ खत व्यवस्थापन पुरेसे नसून झाडाची शास्त्रोक्त पद्धतीने आणि योग्य वेळी छाटणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी पंचनदी येथे थेट आंबा बागेत उतरून शेतकऱ्यांना छाटणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

banner 728x90

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RHWE) स्थानिक प्रगतिशील शेतकरी धनंजय जोशी यांच्या आंबा बागेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.

शास्त्रोक्त छाटणीचे महत्त्व

फळशास्त्र विभागाचे आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी अजित सारंगकर आणि संजय ढवळे यांनी शेतकऱ्यांना छाटणीचे तंत्र आणि त्याचे फायदे समजावून सांगितले.

जुन्या व कमी उत्पादन देणाऱ्या झाडांची योग्य छाटणी करून त्यांचे पुनरुज्जीवन करता येते. तसेच सुकलेल्या, कीडग्रस्त आणि रोगग्रस्त फांद्या काढल्याने झाडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. झाडाला संतुलित आकार दिल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. यामुळे बागेतील उत्पादनक्षमतेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

छाटणीनंतरचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. झाडाला आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा, रोग-किडींपासून संरक्षण आणि योग्य बाग व्यवस्थापन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन

केवळ सैद्धांतिक माहिती न देता विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष झाडावर छाटणी करून दाखवल्याने शेतकऱ्यांना तंत्र समजून घेणे सोपे झाले. उपस्थित आंबा उत्पादकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

आधुनिक पद्धतीने आंबा बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी अशा प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा मोठा फायदा होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, डॉ. निलेश दळवी, डॉ. सुमेध थोरात आणि डॉ. प्रज्ञा गुडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विद्यार्थिनी श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, आदिती आंबे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी मेहनत घेतली.

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या या उपक्रमामुळे पंचनदी परिसरातील आंबा उत्पादकांना आधुनिक बाग व्यवस्थापनाची माहिती मिळाली असून, अशा प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये शास्त्रोक्त पद्धतींचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *