Breaking News

चिपळूण : रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची भास्करराव जाधवांची मागणी

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आणि अनियमित राहिल्याने भात व नाचणी पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि लांजा या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.

या प्रश्नावर रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. जिल्ह्यातील पर्जन्यमान, शेतीची परिस्थिती तसेच भात आणि नाचणी पिकांचे नुकसान लक्षात घेता उर्वरित नुकसानग्रस्त तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, असा ठराव त्यांनी बैठकीत मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला आहे.

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा दावा आमदार जाधव यांनी पत्रात केला आहे. प्रत्यक्ष पर्जन्यमान आणि शेतीच्या नुकसानीचा विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शासनाकडे पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध असून गावागावांत पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री निकषांवर आधारित निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या सहा तालुक्यांमध्ये पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू असलेल्या सवलती, मदत आणि शासकीय उपाययोजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आता शासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *