Breaking News
राजापूर : 75 वर्षीय वृद्धाला लाकडाने मारहाण, राजेंद्र वालम विरोधात गुन्हा दाखल लांजा-दाभोळे मार्गावर पिकअपमधून दोन बैलांची वाहतूक, 2.71 लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी : ‘एक लाख भरा, एक कोटी कर्ज घ्या’चे आमिष; 40 ते 45 नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप,1 टक्का व्याजदराचे आमिष; ऑनलाइन लाखो रुपयांची देवाणघेवाण लांजा : ‘आजी, पुढे सोडतो’ म्हणत दुचाकीवर बसवले; घराच्या गेटवर पोहोचताच ‘फोटो काढतो’ सांगून दागिने लंपास, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले चिपळूण : जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य शिबिर, अपरांत हॉस्पिटल येथे जागतिक हृदय दिनानिमित्त चिपळूणात 99 रुपयांत कार्डियाक रिस्क असेसमेंट शिबिर

रत्नागिरी : ‘एक लाख भरा, एक कोटी कर्ज घ्या’चे आमिष; 40 ते 45 नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप,1 टक्का व्याजदराचे आमिष; ऑनलाइन लाखो रुपयांची देवाणघेवाण

banner 468x60

फक्त एक लाख रुपये भरा आणि अवघ्या एक टक्का व्याजदराने तब्बल एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवा, असे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे. या कथित आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात सुमारे ४० ते ४५ नागरिक अडकल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. काही नागरिकांना तर तब्बल चार कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे पुरावेही पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

एक लाख रुपये ऑनलाइन भरल्याचा दावा

तक्रारदारांच्या माहितीनुसार, एका महिलेने नागरिकांना मोठ्या कर्जाचे आमिष दाखवत कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. कर्ज मिळवण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकी एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे.

नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम भरल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटून गेला. मात्र, कोणाचेही कर्ज मंजूर झाले नाही. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता कर्ज मंजुरीसाठी वेगवेगळ्या तारखा सांगून वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

१५ कोटींची रक्कम दाखवल्याचा दावा

नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची मोठी रक्कम दाखवण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. ही रक्कम ‘बँक मनी’ असल्याचे भासवण्यात आले होते, तसेच ती गुहागर येथून आणण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.

या व्यवहाराशी संबंधित विविध व्यक्तींमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे तक्रारदारांनी पोलिसांसमोर सादर केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या व्यवहारांमागील नेमकी व्यक्ती, पैशांचा प्रवाह आणि कर्ज देण्याच्या आश्वासनामागील संपूर्ण यंत्रणा याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

गणेशगुळे फाट्यावरील मध्यरात्रीच्या कथित व्यवहाराचीही चौकशीची मागणी

दरम्यान, चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्री संशयास्पदरीत्या पैशांचे वाटप झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या घटनेचा आणि कथित कर्ज व्यवहाराचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय या कथित आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहून नेण्यासाठी एका रिक्षाचा वापर झाल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. लाखो आणि कोट्यवधी रुपयांची रोकड या रिक्षातून नेण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून, संबंधित रिक्षाचालक आणि मालकाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पैसे परत मागितल्यावर धमकी दिल्याचा आरोप

कर्ज मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित महिलेने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.

पोलिसांत तक्रार केल्यास किंवा १५ कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराची माहिती बाहेर सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच खोटी कागदपत्रे आणि धनादेश तयार करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांच्या चौकशीतून चित्र स्पष्ट होणार

सुमारे ४० ते ४५ नागरिक या कथित कर्ज व्यवहारात अडकले असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असला, तरी या प्रकरणातील नेमकी फसवणुकीची रक्कम, सहभागी व्यक्तींची संख्या आणि व्यवहाराची संपूर्ण व्याप्ती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे पुरावे, कथित १५ कोटींची रक्कम, रोख पैशांच्या वाहतुकीबाबतचे आरोप तसेच धमकीचे आरोप या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या तक्रारीवर रत्नागिरी शहर पोलीस कोणती कारवाई करतात आणि तपासातून नेमके काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *