दापोली-खेड मार्गावर पुन्हा अपघात, कुंभवे कातळ–नवशी पाटी पुलावर कारची दुभाजकाला जोरदार धडक

banner 468x60

दापोली-खेड मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच कुंभवे कातळ ते नवशी पाटी दरम्यान असलेल्या पुलावर आज पहाटे एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. भरधाव कार पुलाच्या कठड्याला जोरदार धडकल्याने वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेचा जोर इतका होता की वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

banner 728x90

दरम्यान, दापोली-खेड मार्गावरील रस्ते रुंदीकरण आणि बांधकामाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पुलासह अनेक ठिकाणचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, बांधकाम सुरू असलेल्या भागात आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याची तक्रार वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.

विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक, धोक्याच्या सूचना, रिफ्लेक्टर, दिशादर्शक चिन्हे किंवा वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप आहे. परिणामी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दापोली हे कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर हजारो पर्यटक या मार्गाचा वापर करतात. मात्र खेड-दापोली मार्गावरील अनेक तीव्र वळणे, अपूर्ण बांधकाम आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. रस्त्यालगत शाळा, वस्ती आणि बाजारपेठा असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या मते, संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने चेतावणी फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स आणि इतर सुरक्षा साधने बसविण्याची गरज आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, याबाबत वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या ताज्या अपघातानंतर तरी प्रशासन आणि संबंधित विभागाने गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *