“प्लास्टिक मुक्त दापोली” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत जेसीआय दापोलीतर्फे आयोजित “जेसीआय चषक 2026” ही भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साह, क्रीडास्पर्धा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संगम ठरली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाबरोबरच पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा प्रभावी संदेश देण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते तसेच जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “प्लास्टिक मुक्त दापोली” या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
स्पर्धेदरम्यान सामाजिक बांधिलकी जपत बहुजन हिताय विद्यामंदिर (आगरवायंगणी) आणि रामराजे स्कूल अँड कॉलेज (दापोली) या शैक्षणिक संस्थांना सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेत एकूण 19 संघांनी सहभाग घेतला. सर्व सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात इमाद पॅकर्स संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर सनी कोंड, दापोली संघ उपविजेता ठरला. अंतिम सामना अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा झाला.
स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीतही खेळाडूंनी आपली छाप सोडली. इमाद पॅकर्स संघाचा ओसामा याने मालिकावीर तसेच सर्वोत्तम फलंदाज हे दुहेरी मान पटकावले. सनी कोंड संघाच्या अमित याला सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला, तर दापोली 11 संघाच्या जतिन साळगावकर याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभालाही मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगराध्यक्षा कृपा घाग, साधना बोत्रे, डॉ. जयवंत जालगांवकर, राजू घोसाळकर, राहुलशेठ राठोड, मिलिंद शेठ तसेच जेसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी. “प्लास्टिक मुक्त दापोली” या उद्दिष्टासाठी कागदी व कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच एसटी चालक, वाहक आणि रिक्षाचालकांना स्टीलच्या बाटल्यांचे वाटप करून प्लास्टिक वापर कमी करण्याचा संदेश देण्यात आला. बीच स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
या भव्य स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली जेसी बासीत देशमुख, तेजस मेहता, रोशन वेदक, सीए रुषी शेठ, अद्नान मुकादम, रुषी तलाठी, भूषण इसवलकर, कुणाल मंडलिक, स्वप्नील मेहता, अनिकेत खानविलकर, फराझ रखांगे आणि इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
एकूणच, “जेसीआय चषक 2026” ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता समाजसेवा, पर्यावरण जागरूकता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी घटना ठरली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













