दापोली : इनाम पांगारीच्या सुहास दिवाळेची NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड, गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निसर्गरम्य इनाम पांगारी या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुहास सुनिल दिवाळेने आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अविरत मेहनतीच्या जोरावर भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) म्हणून निवड होण्याचा मान मिळवला आहे.

banner 728x90

संपूर्ण भारतातून विविध राज्यांतील १ हजार ४४० विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या १२० विद्यार्थ्यांमध्ये सुहासची वैज्ञानिक अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गाव, दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या अभिमानात भर पडली आहे.

सुहासचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनाम पांगारी येथे झाले. या काळात निलेश खांडेकर आणि श्री. साळवी गुरुजी यांनी त्याचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. लहानपणापासूनच त्याच्या बुद्धिमत्तेची चमक शिक्षकांच्या लक्षात आली होती.

इयत्ता पाचवीत त्याने विश्राम रामजी घोले हायस्कूल, वाकवली येथे प्रवेश घेतला. गुणवत्तेच्या जोरावर त्याची जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर येथे निवड झाली. मात्र, तेथील वातावरणाशी जुळवून न घेता त्याने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावातील माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा, निवे-बुद्रुक येथे पूर्ण केले.

यानंतर इयत्ता अकरावीचे शिक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे पूर्ण करून बारावीचे शिक्षण चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खेड येथे प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. पुढे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत २०१९ मध्ये प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केली.

शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा सुहासने कायम ठेवली. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. कठीण मानली जाणारी GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षा त्याने तीन वेळा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.

यानंतर त्याने ISRO, BARC, HPCL, RRB JE, IOCL, DRDO आणि BMC यांसारख्या विविध संस्थांच्या परीक्षांसाठी प्रयत्न केले. अनेक परीक्षांमध्ये तो मुलाखतीपर्यंत पोहोचला; मात्र अंतिम यश काही काळ हुलकावणी देत राहिले. तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.

अखेर २०२५ मध्ये त्याने IIT मुंबई येथे M.Tech साठी प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असतानाच त्याची NPCIL मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली. सुहासच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *