रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे विराजमान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून भरदिवसा सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण चोरीला गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सत्यनारायण पूजेच्या वेळी मंडपात झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ताम्हणावर हात साफ केल्याचा संशय आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शंखेश्वर मधुबन, बोर्डिंग रोड, माळनाका येथील अमरेश सुरेश पावसकर (वय ४४) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी सकाळी ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास गणपतीच्या मूर्तीसामोरील भागात धार्मिक विधी सुरू होते. पूजेच्या साहित्यात सुमारे ४०० ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे ताम्हण ठेवण्यात आले होते.
गणेशोत्सवामुळे मंडपात भाविकांची मोठी गर्दी होती. पूजा सुरू असतानाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोणाच्याही लक्षात न येता चांदीचे ताम्हण लंपास केल्याचा संशय आहे.
पूजेदरम्यान ताम्हण जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच उपस्थित भाविकांनी परिसरात ताम्हणाचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही ते सापडले नाही.
त्यानंतर अमरेश पावसकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, चोरीचा प्रकार नेमका कसा घडला आणि चांदीचे ताम्हण घेऊन जाणारा व्यक्ती कोण होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मंडप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह पूजेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची माहिती घेतली जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्याचे काम रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











