दापोली तालुक्यातील दाभिळ येथे एका वृद्ध नागरिकाच्या राहत्या घरातून परवानाधारक बंदूक चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घरातील बेडरूममध्ये बेडच्या कोपऱ्यात ठेवलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभिळ येथील रहिवासी इसाक याकुब दळवी (वय ७८) यांनी आपली परवानाधारक १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक घरातील बेडरूममध्ये बेडच्या कोपऱ्यात ठेवली होती. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही बंदूक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दळवी हे घरी असतानाच ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या वृद्धत्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेत किंवा त्यांची नजर चुकवून अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बंदूक चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बंदुकीची ओळख पटविण्यासाठी विशिष्ट वर्णन
चोरीस गेलेली बंदूक काळ्या रंगाची लोखंडी असून, तिला शिसमच्या लाकडाचा बट्टा आणि खाकी रंगाची नायलॉन स्लिंग आहे. बंदुकीवर एसबीबीएल ३८२/१९७८ असा क्रमांक नमूद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या बंदुकीची अंदाजे किंमत १० हजार रुपये आहे.
तीन महिन्यांनंतर पोलिसांत तक्रार
या घटनेप्रकरणी इसाक याकुब दळवी यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून परवानाधारक बंदूक चोरीला गेल्याच्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. चोरीस गेलेली बंदूक अद्याप मिळाली आहे की नाही, तसेच या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांच्या तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













