दापोली : डॉ. प्रशांत परांजपे यांना २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’, पर्यावरण आणि सामाजिक कार्याचा सन्मान

banner 468x60

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील डॉ. प्रशांत परांजपे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २३ जुलै २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

banner 728x90

डॉ. प्रशांत परांजपे हे लेखक, पत्रकार, पर्यावरण अभ्यासक, साहित्यिक, संग्राहक, व्याख्याते, पर्यटन व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा राष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यात आला.

‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धन, सामाजिक व युवा प्रबोधन, मनोधैर्य योजना, अनाथांसाठी मायेची चादर यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहेत. रत्नागिरीसह पालघर, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये विविध संस्थांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे उभे केले आहेत.

डॉ. परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त असून, आदर्श पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच, यशदा (पुणे) अंतर्गत घनकचरा व जलव्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत. शाश्वत पर्यावरण विकास या विषयावर ते महाराष्ट्रभर व्याख्यानांद्वारे जनजागृती करत आहेत.

दापोली पोलीस ठाण्यात ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील पहिले ‘इको-फ्रेंडली कायदा म्युझियम’ उभारले आहे. या माध्यमातून वाहतूक नियम, पोक्सो कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच ते महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक, दापोलीचे संस्थापक अध्यक्ष असून, पर्यावरण विषयक संस्थांच्या फेडरेशन, महाराष्ट्र राज्यचे मुख्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत.

जल, जमीन आणि जंगल संवर्धन या क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान असून, “मनुष्य पाणी निर्माण करू शकतो आणि पोषक माती तयार करू शकतो” हा त्यांच्या यावर्षीच्या संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे.

पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉ. प्रशांत परांजपे यांना २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *