दापोली : 5 लोकहिताच्या प्रश्नांसाठी 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांचा इशारा, प्रशासनाला निवेदन

banner 468x60

दापोली तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांनी येत्या १५ ऑगस्ट २०२६ पासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून, संबंधित प्रश्नांबाबत अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

banner 728x90

निवेदनात दापोली तालुक्याच्या विकासाशी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित पाच प्रमुख प्रश्न अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दापोली एसटी आगारासाठी मंजूर झालेल्या १६ बसांपैकी केवळ ५ बसच उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बसफेऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक गावांतील प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य मार्ग क्रमांक १७ च्या कामादरम्यान पालगड नळपाणी योजनेचे झालेले नुकसान. या कामामुळे पाणीपुरवठा यंत्रणेला फटका बसला असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे दापोली तालुक्यातील किनारपट्टी भागातील रस्त्यांची दुरवस्था. अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. वाढत्या बांधकाम खर्चामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल, असे इदाते यांनी निवेदनात म्हटले आहे.

पाचवा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दापोली तालुक्यात सुरू असलेल्या जंगलतोडीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी. अनियंत्रित जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रीराम (भाऊ) इदाते यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, हे सर्व प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर १५ ऑगस्ट २०२६ या स्वातंत्र्यदिनापासून दापोली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एसटी महामंडळ तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि आंदोलनापूर्वी सकारात्मक निर्णय घेतला जातो का, याकडे आता संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *