दापोली : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून पडली बाहेर

banner 468x60

दापोली तालुक्यातील आसुद तुळशीमोहल्ला येथून २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आंबवली येथे कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेली ही तरुणी अद्याप घरी परतलेली नाही. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफशीन कलंदर ऐनरकर (वय २४, रा. आसुद तुळशीमोहल्ला, ता. दापोली) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ती आंबवली येथे कपडे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.


अफशीन घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी आंबवली गावात जाऊन तिचा शोध घेतला. मात्र, ती तेथे आढळून आली नाही. त्यानंतर नातेवाईक, शेजारी तसेच आसपासच्या परिसरातही तिचा शोध घेण्यात आला. सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.


अखेर आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत तिची आई अन्वरी कलंदर ऐनरकर (वय ४५) यांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.२७ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी दापोली पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणी नेमकी कुठे गेली, ती कोणाच्या संपर्कात होती आणि तिच्या बेपत्ता होण्यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे आसुद परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून बेपत्ता तरुणीचा लवकरात लवकर शोध लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.