दापोली | प्रतिनिधी – सागर गोवळे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी स्नेही’ समूहाच्या विद्यार्थिनींनी वणोशी तर्फ पंचनदी (देऊळवाडी) येथे “उपयुक्त व उपद्रवी कीटक” या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मित्रकीटकांचे शेतीतील महत्त्व, उपद्रवी किडींची ओळख आणि त्यावरील प्रभावी नियंत्रणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतींची माहिती देण्यात आली. मधमाशी, लेडीबर्ड भुंगा, हिरवा लेसविंग, व्याधपतंग, मुंगी आणि कोळी यांसारखे मित्रकीटक परागीभवन, उपद्रवी किडींचे नैसर्गिक नियंत्रण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.

पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे भात पिकातील खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, लष्करी अळी, निळे भुंगेरे, आंबा पिकातील मोहोर तुडतुडे व फळमाशी, तसेच नारळ पिकातील गेंडाभुंगा यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि नियंत्रणाचे उपाय समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे जिवंत कीटकांचे प्रात्यक्षिक. उपस्थित शेतकऱ्यांना मधमाशी, फळमाशी आणि मुंगी यांचे प्रत्यक्ष नमुने दाखवून उपयुक्त व उपद्रवी कीटकांमधील फरक स्पष्ट करण्यात आला.
प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांवरील पीठ्या ढेकूण तसेच साठवणूक धान्यावरील सोंडे कीड नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थिनींनी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उपयुक्त व उपद्रवी कीटकांची अचूक ओळख होण्यास मदत झाली असून पर्यावरणपूरक व शाश्वत कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी समृद्धी जाधव,. नीलम मदने,. तन्वी नादिवडेकर,. श्रुती बोबडे,. साक्षी लोके,. अंकिता मुंज,. सलोनी सावंत, कोमल झिरवाळ,. श्रावणी मोरे आणि. आकांक्षा गाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













