लांजा : तोल जाऊन पडल्याने अपंग तरुणीचा मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे एका २४ वर्षीय अपंग तरुणीचा तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता दीपक दिवाळे (वय २४) ही तरुणी जन्मापासूनच शारीरिकदृष्ट्या अपंग होती. तिला दम्याचा तसेच पित्ताचा त्रासही होता. तिच्या प्रकृतीमुळे ती चालताना नेहमी घरातील भिंतीचा किंवा वस्तूंचा आधार घेत असे. कुटुंबीय तिची विशेष काळजी घेत असत.

२० एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नम्रता घरात टीव्ही पाहत होती. यावेळी ती शोकेसचा आधार घेऊन उभी राहण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचा तोल गेला. संतुलन बिघडल्यामुळे ती जोरात जमिनीवर कोसळली आणि काही क्षणातच बेशुद्ध झाली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी घाबरून जाऊन तिला तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी सापुचेतळे येथील डॉ. साउळवाडे यांच्या दवाखान्यात नेले. मात्र, त्या वेळी दवाखाना बंद असल्यामुळे वेळ न दवडता तिला वाडिलिंबु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता नम्रताचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून २१ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:०६ वाजता अधिकृत नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, नम्रता ही स्वभावाने शांत व कुटुंबीयांशी जुळवून घेणारी असल्याने तिच्या अकाली निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे. तिच्या निधनामुळे दिवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *