खेड तालुक्यातील लोटे परिसरात अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील एक्सल फाटा परिसरात एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनवर भराव टाकून त्यावर थेट शौचालय उभारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही एमआयडीसी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या पाईपलाईनवर मातीचा भराव टाकून त्यावरच शौचालय बांधण्यात आले आहे. या शौचालयातून झिरपणारे सांडपाणी पाईपलाईनमध्ये जाऊन पिण्याचे पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गंभीर प्रकाराबाबत लोटे आणि घाणेखुंट परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती दिली आहे. नागरिकांनी यामुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्य धोक्याची जाणीव करून देत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.
मात्र, अद्याप एमआयडीसी प्रशासन किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी खेड तालुका भाजप अध्यक्ष विनोद चाळके यांनी पुढाकार घेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पिण्याच्या पाण्याशी संबंधित हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठा आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













