चिपळूण : शिरळच्या फारूख शिरळकरची देशात अव्वल झेप; ICAI च्या INTT-AT परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील शिरळ या ग्रामीण भागातील गावातील सुपुत्र फारूख लियाकत शिरळकर याने शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भारतीय सनदी लेखापाल संस्था (ICAI) आयोजित International Taxation Assessment Test (INTT-AT) या प्रतिष्ठित परीक्षेत त्याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

banner 728x90


लहानशा गावातून शिक्षणाची वाटचाल सुरू करणाऱ्या फारूखने आपल्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, दृढ निश्चय आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश मिळवले आहे. अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या या परीक्षेत देशभरातील गुणवंत उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणे ही मोठी कामगिरी मानली जाते.


फारूखची शैक्षणिक वाटचाल सुरुवातीपासूनच उल्लेखनीय राहिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात त्याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही प्रतिष्ठित पदवी संपादन केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि करसल्लागार क्षेत्रातील आपले ज्ञान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्याच मेहनतीचे फलित म्हणून आता त्याने ICAI च्या INTT-AT परीक्षेत देशात अव्वल स्थान मिळवत आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे.


फारूखचे हे यश केवळ त्याच्या कुटुंबापुरते किंवा शिरळ गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील योग्य दिशा, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे त्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.


या ऐतिहासिक यशानंतर फारूख शिरळकर, त्याचे वडील लियाकत शिरळकर, आई खतिजा शिरळकर तसेच संपूर्ण शिरळकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याचे विशेष कौतुक केले जात असून, अनेकांनी त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


फारूखच्या या दैदिप्यमान यशामुळे शिरळ गावासह चिपळूण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. त्याची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश देणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *