चिपळूण : ओझरवाडीत धार्मिक कार्यक्रमात मानाच्या ताटावरून वाद, 73 वर्षीय ज्येष्ठाला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत कृष्णा फके (वय ७३, रा. ओझरवाडी, शंकर मंदिर समोर, ता. चिपळूण) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे राखणेचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, जेवणाच्या मानाच्या ताटावरून फिर्यादी आणि काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला वाद काही वेळातच तीव्र झाला.

तक्रारीनुसार, आरोपी अक्षय करंजकर, गणेश शंकर आग्रे, प्रतिक घेवडेकर आणि मंदार गरव यांनी संतापाच्या भरात यशवंत फके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौघेही त्यांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच फके यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात आश्रय घेतला. मात्र आरोपी त्यांच्या मागोमाग थेट घरात शिरल्याचा आरोप करण्यात आला आहे.


घरात घुसल्यानंतर आरोपींनी यशवंत फके यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या कमरेवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपी प्रतिक घेवडेकर आणि मंदार गरव यांनी उजव्या पायाच्या खुब्याजवळ जोरात लाथ मारल्याने त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीच्या वेळी आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर जखमी यशवंत फके यांनी उपचार घेत पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून ६ मे रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *