चिपळूण : माणुसकी शुन्न, ६ महिने गरोदर विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, छळाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या, पती-सासूला १० वर्षे सक्तमजुरी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत, सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहित महिलेचा हुंड्याच्या मागणीसाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार न्यायालयात सिद्ध झाला आहे. या प्रकरणी चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी पती व सासूला दोषी ठरवत कडक शिक्षा सुनावली.

banner 728x90

मयत काव्या हिचा विवाह काही वर्षांपूर्वी दिनेश महादेव कदम याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत चालले; मात्र नंतर पती दिनेश व सासू मिनाक्षी कदम यांनी तिच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने काव्याला सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. विशेषतः ती गर्भवती असतानाही तिच्यावर होणारा अत्याचार थांबला नाही.

या सततच्या त्रासाला कंटाळून काव्याने अखेर आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवत सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींकडून झालेल्या छळाचे पुरावे गोळा करण्यात आले. पोलीस निरीक्षक शरद कुवेस्कर आणि सचिन इंगोले यांनी तपास प्रभावीपणे पूर्ण केला, तर पोलीस हवालदार मिनाद कांबळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील साळवी यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली. साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधान कलम ४९८(अ) (पत्नीवरील क्रूरता), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तसेच प्रत्येकी ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.

या निकालानंतर काव्याच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच सरकारी वकिलांनी सांगितले की, या निर्णयामुळे हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कठोर संदेश जाईल आणि अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *