Breaking News
चिपळूण : मद्यधुंद भरधाव वॅगनआरची दुचाकीला धडक, व्यापारी गंभीर जखमी दापोली : पिसई-विसापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात स्वराज्य प्रतिष्ठान आक्रमक, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर यांनी 1 जूनपासून दिला उपोषणाचा इशारा चिपळूण : पोल्ट्रीच्या वादातून वृद्धेला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल दापोली : जागांच्या नकाशांसाठी शेतकरी, नागरिक झिजवतायत जोडे, दापोलीत भूमी अभिलेख कार्यालयाचा संतापजनक कारभार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातच प्रशासनाची उदासीनता, नागरिकांचा संताप संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे अपघात, उभ्या कंटेनरला भरधाव टेम्पोची जोरदार धडक

चिपळूण : मद्यधुंद भरधाव वॅगनआरची दुचाकीला धडक, व्यापारी गंभीर जखमी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने वॅगनआर कार चालवणाऱ्या चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमी व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग सुरेंद्र सुर्वे (वय ३९, रा. निवळी कोंडवाडी) हे बुधवारी रात्री आपल्या मालकीची मोटरसायकल (क्र. एमएच ०८ एव्हाय ०१८२) घेऊन आबलोली-वहाळफाटा मार्गाने घराकडे परतत होते. रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास ते निवळी स्टॉपजवळ पोहोचले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वॅगनआर कारने (क्र. एमएच ०२ ईपी ०४७८) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारचा वेग प्रचंड होता. चालक सूर्यकांत दत्ताराम लाड (वय ५६, रा. ढाकमोली) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने गाडी थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये नेल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला थेट धडक बसली.

या भीषण धडकेमुळे दुचाकीस्वार सुयोग सुर्वे हे काही अंतरावर रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून शरीराच्या इतर भागांनाही दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी सुर्वे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर वॅगनआर कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. काही काळ या मार्गावरील वाहतुकीत अडथळाही निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान कार चालक सूर्यकांत लाड हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ नुसार नोंदवण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

दरम्यान, वाढत्या मद्यधुंद वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. अशा बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *