चिपळूण : कामथेतील नदीपात्रात धोकादायक वैद्यकीय कचरा, ग्रामस्थ संतप्त, कठोर कारवाईची मागणी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कामथे गावातील गणपती विसर्जन घाट परिसरात अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमधील धोकादायक वैद्यकीय कचरा नदीपात्रात टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लोकवस्तीच्या अगदी जवळ असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

banner 728x90

कामथे गावातील नदी परिसर हा ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक महिला येथे कपडे धुण्यासाठी येतात, तर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठाचा वापर करतात. याशिवाय परिसरातील नागरिकांचे या ठिकाणी सतत येणे-जाणे असते. अशा ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया तसेच विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. या कचऱ्यातील साहित्य संसर्गजन्य असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा धोका असून त्याचा परिणाम मानवांसह जनावरांच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

स्थानिक नागरिकांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कामथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. संबंधितांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने स्पष्ट नियमावली तयार केली आहे. मात्र त्याचे उल्लंघन करून काही व्यक्ती किंवा संस्थांकडून अशा प्रकारे नदीपात्रात कचरा टाकला जात असल्यास ते अत्यंत धोकादायक असून पर्यावरणीय गुन्ह्याच्या स्वरूपाचे आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हा कचरा नेमका कोणत्या रुग्णालयातून किंवा वैद्यकीय संस्थेतून आणण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने तपास सुरू करावा, अशी मागणी होत आहे. सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची तपासणी तसेच परिसरातील वैद्यकीय संस्थांची चौकशी करून दोषींचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कामथे ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “नदीपात्रात वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या प्रकारामुळे पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्य आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *