चिपळूण तालुक्यातील सय्यद मिरा हुसैनी चिस्ती दर्गा परिसरात कुराण पठण करत असलेल्या एका ६२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीवर गैरसमजातून झालेल्या मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात ज्येष्ठाला गंभीर दुखापत झाली असून चिपळूण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खलील अहमद अब्बास डावरे (वय ६२, व्यवसाय- इलेक्ट्रिशियन) हे १८ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-उक्ताड-गुहागर मार्गालगत असलेल्या सय्यद मिरा हुसैनी चिस्ती दर्ग्यात मोठी रात्र असल्याने कुराण पठण करण्यासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते शांतपणे पठण करत असताना तेथे आलेल्या दोघांनी त्यांच्याबाबत गैरसमज करून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी सादीक बशीर बेबल आणि फहद इक्बाल चौगले, दोघेही शिरळ मोहल्ला, चिपळूण येथील रहिवासी आहेत. फिर्यादी हे भगतगिरी करत असल्याचा संशय आरोपींनी घेतला. त्यानंतर दोघांनी संगनमताने फिर्यादींना शिवीगाळ करत धक्काबुकी सुरू केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी हाताने थपडा, ठोसे मारून त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तक्रारीनुसार, आरोपींनी तेथील दगड उचलूनही फिर्यादींवर हल्ला केला. या मारहाणीत खलील डावरे यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे त्यांचा डावा हात आधीच खांद्यातून निखळलेला असतानाही आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
जखमी अवस्थेत असलेल्या खलील डावरे यांना उपचारासाठी वैद्यकीय मदत घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक १८२/२०२६ दाखल केला आहे.
या प्रकरणी आरोपी सादीक बशीर बेबल आणि फहद इक्बाल चौगले भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दुखापत करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे या स्वरूपाचे आरोप आरोपींवर करण्यात आले आहेत.
धार्मिक स्थळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींची भूमिका, घटनेमागील नेमके कारण आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













