चिपळूण : घरडा वाचनालय चिपळूणची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

banner 468x60

चिपळूण शहरातील घरडा वाचनालय ची वार्षिक सर्वसाधारण सभा ट्रेंड सेंटर येथील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर होते.

banner 728x90


सभेच्या प्रारंभी मागील वर्षातील कामकाजाचा आणि आर्थिक अहवालाचा आढावा कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी सादर केला. हा अहवाल उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केला. वाचनालयाच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आणि प्रशस्त जागेची आवश्यकता असल्याचे मत उपाध्यक्ष प्रकाश काणे यांनी व्यक्त केले. तसेच घरडा उद्योग समूहाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सभेदरम्यान वाचनालयाचे नवीन जागेत स्थलांतर करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

शहरातील डॉ. यतिन जाधव यांच्या भरीव आर्थिक सहकार्यामुळे आणि त्यांच्या नवीन जागेत वाचनालय स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावास सर्व सभासदांनी एकमुखाने मान्यता दिली. यावेळी डॉ. जाधव यांच्या योगदानाबद्दल सभागृहात अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जाधव परिवाराच्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर वाचनालयाला नवीन नाव देण्याचा प्रस्ताव धनंजय चितळे यांनी मांडला.

त्यानुसार डॉ. यतिन जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विभा आणि वडील कै. अरविंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयाचे नामकरण ‘विभा अरविंद ग्रंथालय’ असे करण्यात आले. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी प्रकाश काणे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉ. वैशाली जाधव, कार्यवाहपदी विजय कदम, कोषाध्यक्षपदी विनायक ओक यांची निवड करण्यात आली.

तसेच सदस्य म्हणून प्रसाद रिसबुड, विकास मेहेंदळे, राजश्री सोमण, गौरी भोसले, मेघा बेटकर, प्रकाश गांगण आणि सुरेश चव्हाण यांचा समावेश करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मावळते अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत उपस्थित सभासद, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

सभेला डॉ. अरविंद पोतदार, सुनील खेडेकर, सतीश विरकर, राष्ट्रपाल सावंत, डॉ. माधव सोमण यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *