चिपळूण शहरातील काविळतळी परिसरात पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. प्रियांश नवनीत नरळकर (वय ५) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५०/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
उपचारात हलगर्जीपणा झाल्याची चर्चा शहरात पसरताच अनेक नागरिक, नगरसेवक, पत्रकार तसेच वैद्यकीय अधिकारी संबंधित रुग्णालयात दाखल झाले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रियांशला ताप, पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला काविळतळी येथील साने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला ०.६ एमएल फिनार्गन इंजेक्शन दिल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
यानंतर प्रियांशला घरी आणण्यात आले. काही वेळाने पुन्हा उलटी व जुलाब सुरू झाल्याने त्याला चिपळूण येथील संजिवनी क्लिनिकमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर त्याला डीहायड्रेशन झाल्याचे सांगून सलाईन व औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्याला घरी नेण्यात आले.
घरी आल्यानंतर प्रियांशने नारळपाणी, सफरचंद व डाळिंब खाल्ले. मात्र त्याला पुन्हा झोप येत असल्याचे तसेच पोट दुखत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे त्याला देण्यात आली आणि तो झोपला.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याला पुन्हा जुलाब होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने साने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्याला ऑक्सिजन देण्यात आला. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सायंकाळी ७.४५ वाजण्यापूर्वीच प्रियांशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
एकुलता एक मुलगा गमावल्याने नरळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रियांशच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १.१९ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिमुकल्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













