चिपळूण : दुचाकीच्या आरशावरून तुफान राडा; कोयता, बॅटसह हाणामारी, सहाजणांवर गुन्हे

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील रेहेळ गावात दुचाकीचा आरसा हाताला लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूप थेट तुफान हाणामारीत झाले. या घटनेत लाकडी बॅट, लोखंडी कडे तसेच कोयत्याचा वापर झाल्याने परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश पांडुरंग शेलार हे पूजेच्या कार्यक्रमावरून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी समोरून दुचाकीवरून येणारे महेंद्र तुकाराम बामणे यांच्या गाडीचा आरसा रुपेश शेलार यांच्या दंडाला लागला. या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद अधिक चिघळला आणि दोन्ही गट आमनेसामने आले.

तक्रारीनुसार, महेंद्र बामणे यांच्यासह अभिषेक बामणे, तन्मय बामणे, राजेंद्र बामणे आणि सुशांत बामणे यांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवून रुपेश शेलार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अभिषेक बामणे याने हातातील लाकडी बॅटने रुपेश शेलार यांच्या तोंडावर आणि बरगडीवर वार केल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच तन्मय बामणे याने कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारामारीदरम्यान लोखंडी कड्यांचाही वापर झाल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही परस्पर तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *