चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर रत्नागिरी विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सखोल तपासासाठी कोठडीची मागणी केली होती.
प्राथमिक माहितीनुसार, गर्भपातासाठी आवश्यक औषधांचे किट उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप डॉ. मदार यांच्यावर आहे. या व्यवहारामागील आर्थिक धागेदोरे तपासणे, संबंधित पुरावे गोळा करणे तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे एसीबीने न्यायालयात नमूद केले.
न्यायालयाने तपास यंत्रणेचा युक्तिवाद मान्य करत डॉ. मदार यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता एसीबीकडून त्यांची सखोल चौकशी होणार असून लाचेच्या व्यवहाराशी संबंधित विविध बाबींचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.
या कारवाईनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, डॉ. मदार यांच्याबाबत यापूर्वी झालेल्या तक्रारी आणि आरोपांचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक सुट्टीवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे डॉ. कुंबरे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत, “घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून शंभर टक्के पारदर्शक चौकशी केली जाईल,” असे सांगितले. तसेच या संदर्भातील एसीबीचे पत्र प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
डॉ. कुंबरे यांच्या मते, डॉ. मदार यांनी रुग्णांना दिलेल्या गोळ्या रुग्णालयातील अधिकृत औषधसाठ्यातून देण्यात आल्या होत्या का, यासह इतर सर्व पैलूंची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. यासाठी ६ जून रोजी कामथे उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













