रत्नागिरी : ब्राऊन हेरॉईनसदृश्य अंमली पदार्थासह 21 वर्षीय तरुण ताब्यात, 1.65 लाखांचा मुद्देमाल जप्त, गाजी मोहल्ल्यातून अटक

banner 468x60

रत्नागिरी शहरातील जेलरोड नाका परिसरात ऑलआऊट ऑपरेशनदरम्यान नाकाबंदी करत असताना ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. नुफेरअली खालीद तांडेल (वय २१, रा. गाजी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत अंमली पदार्थ, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३.३२ वाजण्याच्या सुमारास जेलरोड नाका येथे रस्त्याच्या बाजूला नाकाबंदी सुरू होती. यावेळी संशयित नुफेरअली तांडेल याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ आणि तो ठेवण्यासाठी वापरलेले साहित्य आढळून आले.


जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ब्राऊन हेरॉईनसदृश पदार्थ असलेली एक पारदर्शक प्लास्टिक पिशवी असून, पिशवीसह त्याचे वजन ६ ग्रॅम, तर वजन ४ ग्रॅम असल्याचे नमूद आहे. या पदार्थाच्या एकूण १२० पुड्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद असून, त्यांची अंदाजित किंमत ६० हजार रुपये आहे. याशिवाय पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेल्या दोन रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि पुड्या बांधण्यासाठी वापरलेले १२० लहान कागदी तुकडे जप्त करण्यात आले.


तसेच ५ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा नार्झो ८० लाईट मोबाईल हँडसेट आणि १ लाख रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस मॉडेलची पांढऱ्या रंगाची दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एव्हाय २८०५) पोलिसांनी जप्त केली आहे.


या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *