Breaking News
चिपळूण : कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शरद गमरे यांचा जागीच मृत्यू, एसटी बसला ओव्हरटेक करताना काळाचा घाला चिपळूण : कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शरद गमरे यांचा जागीच मृत्यू, एसटी बसला ओव्हरटेक करताना काळाचा घाला दाभोळ : सरपंच राखी तोडणकर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार, पुण्यात‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान’ प्रदान, राज्यस्तरावर गौरव चिपळूण : सावर्डे नजीक कोंडमळा येथे भीषण अपघात, ट्रकला दुचाकीची जोरदार धडक, संगमेश्वर येथील दोघे तरुण गंभीर जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे अपघात दापोली : मजुरी मागितली तर मारण्याची धमकी! साकुर्डेतील चिरेखाणीवर वेठबिगारीचा आरोप, गुन्हा दाखल

चिपळूण : कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शरद गमरे यांचा जागीच मृत्यू, एसटी बसला ओव्हरटेक करताना काळाचा घाला

banner 468x60

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातील शिवाजीनगर बसस्थानकासमोर रविवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शरद तुकाराम गमरे (वय ५८, रा. खांदाटपाली, चिपळूण) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शरद गमरे हे आपल्या दुचाकीने शिवाजीनगर बसस्थानक परिसरातून जात होते. याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर चालक शिवप्रकाश दुबे हा बसस्थानकासमोर प्रवासी उतरविण्यासाठी थांबलेल्या कोल्हापूर-चिपळूण एसटी बसला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. हॉटेल लगूनसमोरील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. एसटी बसच्या शेजारून जाणाऱ्या गमरे यांच्या दुचाकीला या कंटेनरची जोरदार धडक बसली.


धडक इतकी भीषण होती की शरद गमरे हे कंटेनरच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणांतच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली.


दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून निघून जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून संतप्त नागरिक आणि महिलांनी त्याला पकडले. यावेळी संतप्त जमावाने चालकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून संबंधित कंटेनरही ताब्यात घेण्यात आला आहे. मृत शरद गमरे यांचा मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाही आणि शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.


या घटनेची माहिती समजताच चिपळूण पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन गमरे तसेच बौद्ध समाजातील बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. गमरे यांच्या अपघाती निधनाने खांदाटपाली परिसरासह चिपळूणमध्ये शोककळा पसरली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वर्दळीच्या भागात अवजड वाहनांकडून होणाऱ्या ओव्हरटेकिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसटी बससारखे प्रवासी वाहन थांबलेले असताना अवजड वाहनांनी घेतलेल्या चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे अशा प्रकारचे अपघात किती गंभीर ठरू शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे. या अपघाताचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.